
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)
महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता महापौरपदाच्या आरक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदा महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, याबाबत विविध तर्क-वितर्क लढविले जात असून लॉटरी पद्धतीने होणाऱ्या सोडतीमुळे सर्व अंदाज फोल ठरण्याची शक्यता आहे.महानगरपालिकेत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाचा महापौर होतो, ही सर्वसाधारण प्रथा असली तरी आघाडी किंवा युती झाल्यास मित्रपक्षालाही महापौरपद देण्यात येते. त्यामुळे हेपद मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा केली असली तरी महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. येत्या एक-दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.महापौरपदाचे आरक्षण यंदा 'शून्य' झाल्यामुळे यावेळी रोस्टर पद्धतीऐवजी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे.यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, सर्वसाधारण महिला तसेच खुला प्रवर्ग अशा सर्वच प्रवर्गाच्या चिठ्ठ्या टाकण्यात येणार असून त्यातून निघणाऱ्या चिठ्ठीवर महापौरपदाचे आरक्षण निश्चित होणार आहे.अमरावती महानगरपालिकेत २०२६ मध्ये १७ वा महापौर निवडून येणार आहेत. मागील पंचवार्षिक कालावधीत अनुसूचित जाती व ओबीसी प्रवर्गासाठी प्रत्येकी अडीच वर्षांचे आरक्षण लागू होते. यंदा कोणत्या प्रवर्गाला संधी मिळते, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
आतापर्यंत झालेले पक्षनिहाय महापौर
▲ अमरावती महानगरपालिकेचे सभागृह १९९२ मध्ये अस्तित्वात आले. प्रारंभी महापौरपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. काँग्रेसचे डॉ. देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे पहिले महापौर ठरले. त्यानंतर प्रभाकर सव्वालाखे व गोविंद अग्रवाल यांनी काँग्रेसकडून हे पद भूषविले. त्यानंतर विलास इंगोले, दिपाली गवळी, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे व वंदना कंगाले हेही काँग्रेसचे महापौर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अॅड. किशोर शेळके व चरणजीतकौर नंदा, तर भारतीय जनता पक्षाकडून विद्याताई देशपांडे, किरण महल्ले, संजय नरवणे आणि चेतन गावंडे यांनी महापौरपद भूषविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी