
जळगाव, 18 डिसेंबर (हिं.स.) जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या औट्रम (कन्नड) घाट मार्गावरील वाहतुकीच्या सद्यस्थितीची पाहणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केली. या पाहणीदरम्यान घाटातील रस्त्यांची स्थिती, वाहतुकीतील अडथळे, वाहतूक नियंत्रण व सुरक्षितता उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घाट मार्गावरील वाहतूक सुरळीत व वेळेत सुरू राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी संबंधितांना दिले. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना राबविणे, अपघातप्रवण ठिकाणी विशेष खबरदारी घेणे व प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच वाहतूक पोलीस, नगरपरिषद व महसूल प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी दिल्या. या पाहणीप्रसंगी चाळीसगाव उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील , नगरपरिषद मुख्याधिकारी सौरभ जोशी ,तसेच वाहतूक पोलीस उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर