
चंद्रपूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। निवडणुका ह्या लोकशाहीचा प्रमुख केंद्रबिंदू असून नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी चंद्रपूर मनपा प्रशासन सज्ज आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी केले.
मनपा कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपजिल्हाधिकारी रोहयो,उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम,पोलीस उपअधिक्षक प्रमोद चौघुले,जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल जटाळे,तहसीलदार रेणुका कोकाटे (बल्लारपूर),मुख्याधिकारी विशाल वाघ (बल्लारपूर) तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने १६ डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिका मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. आचारसंहितेचे कुठेही त्याचे उल्लंघन होणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच प्रचारादरम्यान प्रक्षोभक आणि द्वेष पसरविणारी भाषणे करू नये.
याप्रसंगी महानगरपालिका निवडणुक पारदर्शकतेने पार पडाव्यात व ज्यास्तीत ज्यास्त मतदान व्हावे यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग लाभण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
एक खिडकी योजना -उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक ना हरकत पत्रे घेणे सोईचे व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयात एक खिडकी व्यवस्था कार्यान्वित केली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव