नाशिक न्यायालयाला बॉम्बची धमकी; तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)।जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने गुरुवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. देशातील काही महत्त्वाच्या न्यायालयांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर नाशिक न्य
नाशिक न्यायालयाला बॉम्बची धमकी; तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट


नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)।जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने गुरुवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. देशातील काही महत्त्वाच्या न्यायालयांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर नाशिक न्यायालयातही खळबळ उडाली.

धमकीची माहिती मिळताच सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली. न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकाला (बीडीडीएस) तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच वाढलेल्या हालचालींमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. न्यायालयात आलेले वकील, पक्षकार, कर्मचारी व नागरिकांची धावपळ उडाली. बीडीडीएस पथकाने श्वान पथक व आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने न्यायालयाची मुख्य इमारत, सभागृह, पार्किंग परिसर तसेच आजूबाजूचा संपूर्ण भाग बारकाईने तपासला. मात्र तपासणीत कोणताही संशयास्पद पदार्थ किंवा स्फोटक आढळून आले नाही.सखोल तपासणीनंतर सदर धमकी ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काही काळासाठी विस्कळीत झालेले न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीत करण्यात आले.दरम्यान, धमकी देणाऱ्या ई-मेलचा स्रोत शोधण्यासाठी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तत्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande