
रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : राजापूरमधील कीर्तनप्रेमी समूहातर्फे येत्या ९ ते ११ जानेवारी या काळात तीन दिवसांचा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. समूहातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आनंद देणाऱ्या या कलेची व्याप्ती अशी आहे की ब्रह्मानंदी टाळी लागते. कीर्तन हा एक आगळावेगळा कलाविष्कार आहे. कीर्तन म्हणजे भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगान करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कलाप्रकार आहे. संतसाहित्य, संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयांवर निरूपण, दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा, कलेचा आविष्कार आहे. सध्या कीर्तनात वारकरी कीर्तन, संयुक्त कीर्तन, जुगलबंदी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वैज्ञानिक कीर्तन असे प्रकार सादर केले जातात.
राजापूरमध्ये गेल्या वर्षापासून कीर्तनप्रेमी समूह तीन दिवसांचा कीर्तन महोत्सव आयोजित करत आहे. गावागावांतील मंदिरात उत्सवात कीर्तने होत असतात. पण काही वेळा सर्वांनाच त्याचा आस्वाद घेता येत नाही. तोच भक्तिपूर्ण आनंद घेता यावा, यासाठीच याचे आयोजन कीर्तनप्रेमी समूहाने केले आहे.
हा कीर्तन महोत्सव ९ जानेवारी ते ११ जानेवारी असा तीन दिवस होणार आहे. पहिल्या दिवशी प्रशांत धोंड (कुडाळ), १० तारखेला कैलास खरे (रत्नागिरी) आणि अखेरच्या दिवशी ११ तारखेला सौ. मानसीताई बडवे (पुणे) यांची कीर्तने संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहेत. किर्तनानंतर सर्वांना प्रसादाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कीर्तनप्रेमी समूहातर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला प्रवीण करंबेळकर, महेश सप्रे, प्रकाश पाध्ये, अनंत रानडे, राजू रानडे आणि प्रसन्न देवस्थळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी