
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)।आजच्या समाजात वाढत चाललेल्या सामाजिक व आर्थिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर “सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज असून तीच खरी मानवसेवा आहे”, असे मत सुप्रसिद्ध समाजसेवक रतनलाल गोयल यांनी व्यक्त केले.
त्यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. १५ मार्च २०२६ रोजी गरीब व गरजू कुटुंबातील युवक-युवतींसाठी भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गोयल पुढे म्हणाले की, विवाह समारंभांमध्ये होणारा अवाजवी खर्च अनेक कुटुंबांसाठी आर्थिक ओझे ठरत आहे. अनेक पालक मुलीच्या विवाहाच्या चिंतेत असतात. अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळे समाजात एकता, सहकार्य व मानवतेचा सकारात्मक संदेश देणारे ठरतात.
या सोहळ्यात विवाहबंधनात अडकणाऱ्या प्रत्येक जोडप्याला कपाट, पंखा, गादी, चादर, मिक्सर, देव्हा तसेच भांडी-कुंडी संच असे गृहउपयोगी साहित्य भेटस्वरूप देण्यात येणार आहे. यासोबतच वधू-वरांना संपूर्ण वस्त्रसंच, मंगलसूत्र व आवश्यक साहित्यही प्रदान करण्यात येईल, अशी माहिती भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनचे राजेश अग्रवाल यांनी दिली.
हा धार्मिक विधी व हिंदू संस्कृतीनुसार पार पडणारा विवाह सोहळा गोयल गार्डन, आईमाता मंदिरासमोर, गंगाधाम रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. मागील वर्षी या उपक्रमांतर्गत २५ जोडप्यांचा विवाह पार पडला होता, तर यंदा ५१ जोडप्यांचे विवाह लावण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सर्व विवाह नोंदणी पूर्णतः मोफत असून पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व नाशिक परिसरातील इच्छुक गरजू जोडप्यांनी ९०४९९९२५६० / ९४२०२५०५०४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोयल कुटुंबाच्या सामाजिक जाणिवेतून साकारलेला हा उपक्रम गरिब, निराधार व सर्वसामान्य समाजघटकांना सन्मानाने वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्याची सुवर्णसंधी देईल, असा विश्वास रतनलाल गोयल व राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर