
रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। जनता शिक्षण मंडळ, अलिबाग यांच्या सारळ येथील शाळा संकुलात १५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाने अक्षरशः उत्साहाचा स्फोट घडवून आणला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित या सोहळ्याने चार दिवस संपूर्ण परिसरात चैतन्य पसरवले.
स्नेहसंमेलनाची सुरुवात नुकताच पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागांसाठी आयोजित विविध क्रीडा स्पर्धांनी झाली. या स्पर्धांचे उद्घाटन स्थानिक शाळा समिती सदस्य ऋषिकेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मैदानावर उसळलेला विद्यार्थ्यांचा जल्लोष, जयघोष आणि खेळातील चुरस पाहून उपस्थित पालकही भारावून गेले. विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदवत आपली क्रीडाक्षमता दाखवून दिली.
स्नेहसंमेलनाचे भव्य उद्घाटन संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. डॉ. साक्षी गौतम पाटील व स्थानिक शाळा समिती अध्यक्ष माननीय आर्य गौतम पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळा समिती सदस्य सुशील पाटील, ऋषिकेश नाईक, रमेश पाटील, अशोक पाटील, सखाराम पाटील, यावलकर सर, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष मढवी सर, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते रांगोळी, चित्रकला, हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत पाहुण्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे रंगतदार गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले. १८ डिसेंबर रोजी आयोजित वार्षिक बक्षीस समारंभात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सायंकाळी माध्यमिक विभागाच्या बहारदार गुणदर्शनाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली. सारळमध्ये हे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके