शिवार फुललं तूर पिकांनी… बळीराजा आनंदला! पोषक हवामानामुळे चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील शेतकरी सध्या नैसर्गिक अनुकूलतेमुळे सुखावले असून विशेषतः अचलपूर तालुक्यात तूर पिकाच्या शिवारांनी अक्षरशः बहर घेतला आहे. जिथे नजर जाईल तिथे पिवळ्याधम्मक फुलांचा गालिचा अंथरल्यासारखे मनमोहक दृश्य पाहा
शिवार फुललं तूर पिकांनी… बळीराजा आनंदला! पोषक हवामानामुळे चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा


अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)।

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी सध्या नैसर्गिक अनुकूलतेमुळे सुखावले असून विशेषतः अचलपूर तालुक्यात तूर पिकाच्या शिवारांनी अक्षरशः बहर घेतला आहे. जिथे नजर जाईल तिथे पिवळ्याधम्मक फुलांचा गालिचा अंथरल्यासारखे मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. थंडीची योग्य साथ, पोषक हवामान आणि वेळेवर मिळालेल्या पाण्यामुळे यंदा तूर पीक विक्रमी बहरात आले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे.तूर हे खरिप हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक असून वाढीच्या व फुलोऱ्याच्या टप्प्यात दीर्घकाळ टिकणारी थंडी आणि योग्य आर्द्रता आवश्यक असते. यंदा नेमकी हीच नैसर्गिक अनुकूलता लाभल्याने फुलांची गळती न होता प्रत्येक फांदीवर दाट व निरोगी फुलोरा आला आहे. हा फुलोरा पुढील काळात चांगल्या शेंगा भरण्याचे स्पष्ट संकेत देत आहे.थंडीमुळे व वेळेवर केलेल्या नियोजनामुळे यंदा मावा तसेच इतर शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. त्यामुळे कीटकनाशकांवरील खर्चात बचत झाली असून पीक अधिक निरोगी राहिले आहे. सध्या अनेक ठिकाणी शेंगांचे घड लागलेले दिसत असून उत्पादन चांगले होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण आहे.आता पुढील काही आठवड्यांत पीक परिपक्व होणार असून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा धोका टळल्यास हे सोनेरी स्वप्न साकार होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र उत्पादन चांगले येणार असल्याने शासनाने तूर पिकाला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी बळीराजाकडून जोर धरू लागली आहे. शिवारात डोलणाऱ्या पिवळ्या फुलांकडे पाहून शेतकरी आशेने सुखावलेला दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande