
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)।
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील रस्त्यांवर आणि चौकांमध्ये जाहिरात फलक काढण्यास सुरुवात झाली आहे. आता यापुढे जाहिरात फलक लावताना महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्या इच्छुकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.या जाहिरात फलकांवर ज्या राजकीय पक्षांचे संबंधित इच्छुक असतील, त्याचा खर्च राजकीय पक्षाच्या खर्चात दाखविण्यात येणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील विविध भागांत राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून लावण्यात आलेले जाहिरात फलक काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेची निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने नियोजन केले आहे. शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी जाहिरात फलक लावले होते.
तक्रार निवारण कक्ष
महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक संनियंत्रित समिती, भरारी पथके, तक्रार निवारण कक्ष, निवडणुकीच्या काळात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, प्रचार फेऱ्या, नेत्यांच्या सभा, अवाजवी खर्च यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण पथक तयार केले जाणार आहे. तसेच त्यावर कार्यवाही करण्यासाठी विशेष कक्षदेखील स्थापन केला जाणार आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार स्वीकारूनत्यावर कार्यवाही करण्यासाठी विशेष कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी