
लातूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।
खरीप हंगाम २०२५ मध्ये तांत्रिक कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांना 'ई-पीक पाहणी' पोर्टलवर आपल्या पिकांची नोंदणी करता आलेली नाही, त्यांच्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आता ऑफलाइन पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी २४ डिसेंबरपर्यंत आपापल्या गावच्या तलाठ्यांकडे अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार अहमदपूर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या शेतकऱ्यांची नोंदणी राहून गेली आहे, त्यांच्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबत जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.
अशी असेल कार्यवाहीची प्रक्रिया:
अर्जाची मुदत: दि. १७ ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे लेखी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ग्रामस्तरीय समिती: अर्जांची छाननी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. यात तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी सहाय्यकांचा समावेश आहे.
प्रत्यक्ष स्थळ पाहणी: प्राप्त अर्जांनुसार दि. २५ डिसेंबर २०२५ ते ०७ जानेवारी २०२६ या दरम्यान ही समिती प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करेल.
पंचनामा प्रक्रिया: पाहणीपूर्वी शेजारील ४-५ शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिली जाईल. स्थळ पाहणीवेळी बियाणे/खते खरेदीच्या पावत्या, मागील नोंदी आणि स्थानिक चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक पंचनामा केला जाईल.
महत्वाची टीप:
ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच ई-पीक पाहणी पोर्टलवर यशस्वीरीत्या नोंदणी केलेली आहे, त्यांच्या नोंदीमध्ये कोणतीही दुरुस्ती या प्रक्रियेद्वारे केली जाणार नाही. ही सुविधा केवळ ज्यांची नोंदणी पूर्णपणे राहिलेली आहे, अशाच शेतकऱ्यांसाठी आहे.
तालुक्यातील एकाही पात्र शेतकऱ्याची पीक नोंदणी राहू नये, हा प्रशासनाचा उद्देश आहे. तरी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज तलाठी कार्यालयात जमा करावेत.
— तहसीलदार, अहमदपूर
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis