
चंद्रपूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।
राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला राहणार आहे.
आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे, तो म्हणजे २८० कोटी रुपये किंमतीचे टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकारलेले चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय होय. या प्रकल्पाबाबत आ. मुनगंटीवार यांची टाटा समूहाचे प्रमुख दिवंगत रतन टाटा यांच्याशी चर्चा होत असताना त्यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आ. मुनगंटीवार यांनी मोहन भागवत यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्यांनी २२ डिसेंबर रोजी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.
चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालया पाठोपाठ कॅन्सर रुग्णालया सारखा महत्वाचा आरोग्य प्रकल्प साकारत आहे हे विशेष.
दरम्यान आचारसंहितेदरम्यान कर्करोग रुग्णालयाच्या सार्वजनिक समारंभासाठी निवडणूक आयोगाकडून औपचारिक परवानगी मिळाल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यांच्यासह कोणतेही मोठे राजकीय नेते संहितेनुसार व्यासपीठावर उपस्थित राहणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, विविध सरकारी आरोग्य योजनांअंतर्गत लाभ घेऊन गरीब रुग्णांना येथे मोफत उपचार मिळतील असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव