पाथरीत बाबाजानी दुर्राणींचे सुपुत्र अध्यक्षपदाच्या निवडणूकीत पराभूत, सदस्य पदात दुर्राणी गटास बहुमत
परभणी, 21 डिसेंबर (हिं.स.)। पाथरी नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्ष पदासह सदस्य पदाकरीताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व अटीतटीच्या लढतीत या पालिकेवर गेल्या 35 वर्षांपासून निर्विवाद सत्ता राखणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बा
पाथरीत ‘गड आला पण सिंह गेला’ असं चित्र : ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे सुपुत्र अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पराभूत : तर सदस्य पदाच्या निवडणूकीत दुर्राणी गटास बहुमत


परभणी, 21 डिसेंबर (हिं.स.)।

पाथरी नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्ष पदासह सदस्य पदाकरीताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व अटीतटीच्या लढतीत या पालिकेवर गेल्या 35 वर्षांपासून निर्विवाद सत्ता राखणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचे सुपूत्र जूनेद खान दुर्राणी यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांचे बंधू आसेफ खान शेरगुल खान पठाण यांनी जूनेद दुर्राणी यांचा अटीतटीच्या लढतीत 436 मतांनी पराभव करीत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून दुर्राणी विरुध्द सईद खान यांच्यातील राजकीय लढाईच्या पार्श्‍वभूमीवर पालिका निवडणूका महत्वपूर्ण ठरल्या होत्या. या निवडणूकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात सर्वशक्तीनिशी दंड थोपाटणार हे स्पष्ट होते. दुर्राणी यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत सुपुत्र जूनेद खान तर सईद खान यांनी त्यांचे बंधू आसेफ खान या दोघांना आमने सामने उतरवले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने विद्यमान आमदार राजेश विटेकर यांनी माजी नगराध्यक्ष मोहम्मद अब्दुल हफीज अन्सारी यांना रिंगणात उतरवले. निवडणूकीत दुर्राणी विरुध्द सईद खान असाच सामना झाला. त्याचे प्रत्यंतर अटीतटीच्या लढतीतून जूनेद खान यांना अवघ्या 436 मतांनी पराभूत व्हावे लागले.

दुर्राणी गटाने मात्र सदस्य पदाच्या निवडणूकीत एकूण 23 जागांपैकी 12 जागा स्वतःकडे राखल्या. शिवसेना शिंदे गटास 9 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी अजित पवार गटा 2 जागा मिळाल्या. अन्य पक्ष या लढतीत टिकाव धरु शकले नाहीत.

स्वतःचे सुपूत्रच अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पराभूत झाल्याने दुर्राणी गटास गड आला पण सिंह गेला या स्थितीचा सामना करावा लागला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande