
अकोला, 21 डिसेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले असून फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीमुळे ७० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत असून, हा विजय घडवून आणणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर दिल्ली मधून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी व्यंकटेश आणि काँग्रेस मुंबई कमिटीतील काही पदाधिकाऱ्यांनी दादर, मुंबई येथील राजगृह निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा नेते सुजात आंबेडकर तसेच पक्षाचे रणनितीकार सुमित आनंद उपस्थित होते.
बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस सेक्रेटरी व्यंकटेश यांच्यात यावेळी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राष्ट्रीय पातळीवरील काही प्रस्ताव मांडण्यात आले. मात्र, या प्रस्तावांबाबत अद्याप कोणतीही अंतिम स्पष्टता झालेली नसल्याचे सांगण्यात आले असून, योग्य वेळी याबाबत बाळासाहेब आंबेडकर माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, “आज समाधान आणि आनंद यासाठी आहे की या निमित्ताने काँग्रेस पक्षाला हे भान आले आहे की भाजपाच्या विरोधात ते एकटे लढू शकत नाहीत. भाजप व आरएसएसला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणतेही राजकारण शक्य नाही.”
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे