
रत्नागिरी, 21 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात पालिका निवडणुकीत भाजपला सन्मानजनक जागा मिळाल्या आहेत. भाजपाचे ३६ नगरसेवक, तर २ नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. समन्वय राखून महायुती टिकवली आहे, अशी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहायक अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६ विजयी झाले असून दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तसेच महायुतीमध्ये भाजपने ९ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील ७ जण विजयी झाले आहेत. अशा प्रकारे महायुतीत समन्वय राखून रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचा विजय साकारला गेला आहे.
ते म्हणाले, भाजपाला जागा कमी देण्यात आल्याची टीका केली जात होती. परंतु काही जण पक्षाची नाहक बदनामी करत होते. जागा वाटपात दूरदृष्टी ठेवली. भाजपाचा विचार करून आणि २०२९ च्या विविध निवडणुकीत विजय मिळवायचे लक्ष्य ठेवून नियोजन केले होते. सत्तेत सहभाग असेल तर सगळे होईल, पक्षाचा सन्मान होईल. त्यामुळेच मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून जागांचे वाटप करण्यात आले. भविष्यात कोकणात नक्की भाजपा वाढणार आहे. काहीही झाले तरी २०२९ ची लोकसभा, २ विधानसभा, कोकण पदवीधर निवडणूक, शिक्षक निवडणूक या सगळ्या गोष्टीचा दुरगामी विचार करून ही महायुती केली व ती यशस्वी ठरली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीच्या एकूण १५१ जागा नगरसेवकपदाच्या आहेत. त्यात ३९ जागा भाजपला मिळाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भाजपाची ताकद वाढली आहे. कोठेही ताकद कमी झालेली नसून किंवा भाजपाला कमी लेखण्यात आलेले नाही. जिल्ह्यात सर्व ठिकाणी महायुती अभेद्य आहे. सर्व ठिकाणी समन्वय ठेवण्याचे काम केले आहे.
२०२९ ला भाजप नक्की कोकणामध्ये खूप वाढलेले असेल, पक्षाला चांगले दिवस आलेले असतील. ४७ वर्षांनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक भाजप जिंकली, ही जागा कायम भाजपकडे राहावी, हा विचार आहे. टीकाकारांनी अपप्रचार करू नये, असा इशारा श्री. पटवर्धन यांनी दिला. महायुती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.
भविष्यात भारतीय जनता पार्टी नवीन येणाऱ्यांना संधी द्यायचे ठरवले आहे. यापुढे यंग ब्रिगेडला संधी दिली जाईल. त्यामुळे भाजप पुढील २५ वर्षे चालेल, जुन्या व ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन भाजप रत्नागिरीमध्ये नक्की वाढेल. पक्षासाठी दूरगामी विचार केल्याचे लक्षात येईल. आगामी जिल्हा परिषद किमान १० जागा व पंचायत समितीसाठी २० जागा भाजपाचे सदस्य महायुतीच्या माध्यमातून विजयी होतील. भाजपाचा विचार करून हे केले आहे, यात स्वार्थ नसून भविष्यात भाजपामध्ये अनेक लोक प्रवेश करतील, असा विश्वास श्री. पटवर्धन यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी