
अमरावती, 21 डिसेंबर (हिं.स.)
स्थानिक नेत्यांकडून सगेसोयरे आणि नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या मनात पसरलेली नाराजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जाणवली नसली, तरी निकालात मात्र त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे या दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या.
विशेष म्हणजे त्यांना त्यांच्याच जाऊबाई काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांनी पराभूत केले. तर दुसरीकडे, दर्यापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पूत्र यश लवटे हे अंजनगाव सुर्जीमधून नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, त्यांनाही पराभवाचा धक्का बसला. या दोन्ही आमदारांना मतदारांनी आरसा दाखवल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
दर्यापूरमध्ये भाजपला केवळ चार जागा मिळाल्या असून काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले आहेत. नऊ वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे नलिनी भारसाकळे आणि काँग्रेसतर्फे त्यांचे दीर सुधाकर भारसाकळे अशी लक्षवेधी लढत झाली होती. या निवडणुकीत नलिनी भारसाकळे यांनी सुधाकर भारसाकळे यांच्यावर ६६ मतांनी निसटता विजय मिळवला होता. त्यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपला गड शाबूत राखला होता.
पण, यावेळी मात्र त्यांना धक्का बसला. भारसाकळे कुटुंबातील दोन जावांमध्ये झालेल्या संघर्षात यावेळी मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. प्रकाश भारसाकळे यांचे बंधू सुधाकर भारसाकळे हे काँग्रेसचे नेते आहेत आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत.
गजानन लवटे यांनाही धक्का
अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी, २० डिसेंबर रोजी पार पडली. न्यायालयीन प्रकरणामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही जिल्ह्यातील एकमेव निवडणूक होती.
शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उभे होते. त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत भाजपचे अविनाश गायगोले हे निवडून आले.
काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्याने मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच, शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात ‘रोड शो’ केल्याने ही निवडणूक शिंदे गटासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मात्र अंजनगावात भाजपने बाजी मारली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी