
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)। कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने कर्जतच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट) उमेदवार पुष्पा दगडे यांनी महायुतीच्या उमेदवार स्वाती लाड यांचा पराभव करत ४४७० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण २१ हजार ६८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पुष्पा दगडे यांना १२ हजार ९१६ मते, तर स्वाती लाड यांना ८ हजार ४४६ मते मिळाली.
या निकालामुळे कर्जत नगरपरिषदेवर परिवर्तन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण २१ नगरसेवकांपैकी परिवर्तन विकास आघाडीला १३ जागा मिळाल्या असून महायुतीला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, शिवसेना ठाकरे गटाचे ४ आणि १ अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. तर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ७ आणि भाजपचा १ नगरसेवक निवडून आला आहे.
प्रभागनिहाय निकाल पाहता अनेक ठिकाणी अटीतटीची लढत झाली. प्रभाग १ अ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अरुणा वायकर यांनी विजय मिळवला, तर १ ब मध्ये किशोर कदम यांनी अवघ्या १४ मतांनी बाजी मारली. प्रभाग २ अ आणि २ ब मध्ये शिंदे गटाच्या कोयल कान्हेरीकर व संकेत भासे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला.
राष्ट्रवादीने प्रभाग ३ अ, ४ अ, ४ ब, ५ अ, ७ ब, ९ अ, १० अ आणि १० ब मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवसेना ठाकरे गटाने ३ ब, ६ अ, ८ ब आणि १० क या प्रभागांत यश मिळवले. अपक्ष उमेदवार प्रशांत पाटील यांनी प्रभाग ६ ब मध्ये विजय नोंदवला. थेट नगराध्यक्षपदाचा निकाल आणि प्रभागनिहाय बहुमत यामुळे कर्जत नगरपरिषदेवर परिवर्तन विकास आघाडीची सत्ता निश्चित झाली असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके