
नाशिक, 21 डिसेंबर (हिं.स.)।
,: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षित, सुरळीत व सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आज कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.
या बैठकीत कुंभमेळा काळातील रेल्वे वाहतूक व्यवस्थापन, अतिरिक्त गाड्यांचे नियोजन, रेल्वे स्थानकांवरील सुविधा, भाविकांची गर्दी नियंत्रण, सुरक्षा उपाययोजना तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने रेल्वे व्यवस्थेचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कुंभमेळा यशस्वी व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी रेल्वे प्रशासन, पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करावे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन रेल्वे स्थानकांवर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सेवा, माहिती कक्ष तसेच आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर ठरविलेल्या कृती आराखड्यानुसार सर्व संबंधित विभागांनी वेळेत कामकाज पूर्ण करावे, असे सूचित केले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडलचे वरिष्ठ मंडल अभियंता पंकज धावरे, पोलीस उपायुक्त किशोर काळे, मोनिका राऊत, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्यासह रेल्वे व इतर विभागांचे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कुंभमेळा काळातील रेल्वे संचालन अधिक सक्षम, नियोजनबद्ध व प्रभावी होण्यासाठी रेल्वे विभाग करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. धावरे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV