
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)। महाड नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना राजकारणातील अनिश्चितता आणि आगामी घडामोडींवर सूचक भाष्य केले. सत्ता स्थापन झाली असली तरी संख्याबळ थोडे कमी असल्याचे मान्य करत त्यांनी संयमित पण ठाम भूमिका मांडली.
“सत्ता आलेली आहे. नगरसेवक एक-दोन कमी पडलेत, आम्हाला त्याची हरकत नाही. आता बघूया क्या होता है,” असे स्पष्ट शब्दांत सांगत गोगावले यांनी पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष वेधले. राजकारणातील बदलत्या समीकरणांबाबत ते म्हणाले, “राजकारणात सकाळचा मन दुपारी कुठे असेल आणि दुपारचं सगळं काही कुठे असतं, ते सांगू शकत नाही,” असे सूचक विधान त्यांनी केले.
या निकालात सहकार्य करणाऱ्या घटकांचे त्यांनी विशेष आभार मानले. “खास करून आमचे नितीन पावले, ज्यांनी थोडं मागे सरकून आमच्या सुनील कविस्करांना पाठिंबा दिला. त्यांनी सहकार्य करून आम्हाला जी मदत केली, त्याची अनेक उदाहरणं देता येतील,” असे सांगत गोगावले यांनी नितीन पावले यांच्या भूमिकेचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले, “नितीन यांनी मोठ्या मनाने सुनील यांचे स्वागत केले,” असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी महाडच्या नागरिकांचे अभिनंदन करत मंत्री गोगावले म्हणाले, “मी पुन्हा एकदा माझ्या महाडच्या नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो.”
या प्रतिक्रियेमुळे महाडच्या राजकारणात आगामी काळात घडणाऱ्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सत्तास्थापनेनंतरचे पुढील निर्णय निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके