
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)। रोहा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचंड विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण २० जागांपैकी १८ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असून शहरातील राजकारणावर राष्ट्रवादीचे दणदणीत वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत वनश्री समीर शेडगे यांनी भरगोस मतांनी विजय मिळवला आणि रोहाच्या पहिल्या प्राथमिक नागरिक होण्याचा मान मिळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करून शहरातील मतदारांचा विश्वास मिळवला.
एकूण दहा प्रभागांपैकी बहुसंख्य प्रभागांवर राष्ट्रवादी उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक दोन बी मधून राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड झाली, तर इतर प्रभागांमध्ये राष्ट्रवादी उमेदवारांनी आपली ताकद दाखवली. शिवसेनेला या निवडणुकीत फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले, सुप्रिया जाधव प्रभाग नऊ मधून विजयी झाल्या.
भाजपला एक जागा मिळाली असून रोशन चाफेकर प्रभाग क्रमांक १० मधून यशस्वी झाले.या विजयामुळे रोहा शहरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाबाची उधळण केली, फटाके फोडले आणि शहरभर आनंदाचा उत्सव साजरा केला. नागरिकांनी या निकालाला विकासाभिमुखतेचे स्वागत मानले असून, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्ते विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रोह्यातील या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपली सत्ता मजबुतीने राखत विरोधकांना पराभवाचा संदेश दिला आहे. नगरपरिषदेतील विजयानंतर शहराचे भवितव्य अधिक विकसित आणि नागरिकाभिमुख होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके