
नांदेड, 21 डिसेंबर (हिं.स.)।
कुंडलवाडी नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला असून याचवेळी सर्वच नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. त्यामुळे कुंडलवाडी नगर परिषदेत भाजपाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचे आणि त्यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचे यश आहे असे मत व्यक्त करतानाच खा. डॉ. अजित गोपछडे यांनी भारतीय जनता पार्टीवर मतदाराने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कुंडलवाडीच्या संपूर्ण मतदारांचे ही त्यांनी जाहीररित्या आभार मानले आहेत.
कुंडलवाडी नगर परिषदेची निवडणूक खा डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने लढली. या ठिकाणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ अनेक सभा घेतल्या. बैठका घेतल्या. मतदारांशी संवाद साधला. हितगुज केले . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कुंडलवाडी शहराचा कायापालट करण्यासाठीचा ही विश्वास त्यांनी जनतेला दिला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कुंडलवाडीच्या सुजाण मतदारांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले आहेत . जनतेने दाखवलेला विश्वास हा कुंडलवाडीच्या नवनिर्माणाचा विश्वास आहे. निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कुंडलवाडी शहराचा विकास करण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न असतील असा विश्वास ही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.
दरम्यान कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सह नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या नगर परिषदांवर भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली , भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार निवडून आले , नगराध्यक्ष निवडून आले, त्या सर्व विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचेही खा.डॉ. अजित गोपछडे यांनी अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis