
पुणे, 21 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाकडून अखेर निवडणूक मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात ३५ लाख ५१ हजार ९५४ मतदारांसाठी ९१८ विविध ठिकाणी तब्बल ४ हजार ४ मतदान केंद्रे असणार आहेत.त्यात, शाळा, महाविद्यालये, सोसायट्या तसेच सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे.
प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली. पुणे महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी व अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार यादी अंतिम केली आहे.
मी निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रिया सुलभ व अडथळामुक्त राहावी, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु