
अमरावती, 21 डिसेंबर (हिं.स.)
शंकरपट ही केवळ स्पर्धा नसून आपल्या ग्रामीण संस्कृतीचा, शेतकरी परंपरेचा आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. बैलजोडी आणि शेतकरी हे या देशाच्या अर्थव्यवस्थेचे खरे शिल्पकार आहेत. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला आपल्या परंपरेची ओळख मिळते असे प्रतिपादन तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी केले. संत काशिनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नांदगाव पेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय शंकरपट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आ. वानखडे पुढे म्हणाले की ग्रामीण भारताची ओळख या परंपरांमुळेच टिकून आहे. शंकरपटासारख्या पारंपरिक उपक्रमांमुळे तरुण पिढीला आपल्या संस्कृतीशी, मातीशी आणि शेतकऱ्यांच्या कष्टांशी नाते जोडण्याची संधी मिळते. या परंपरांचे जतन व संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”या विदर्भस्तरीय शंकरपटाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज आणि संत काशिनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, तसेच शंकरपट मैदान व बैलजोडीचे पूजन करून मोठ्या उत्साहात करण्यात आले. उद्घाटनानंतर आ. राजेश वानखडे यांनी स्वतः बैलगाडा चालवत शेतकरी संस्कृतीप्रती आपले प्रेम व्यक्त केले. त्यांच्या या कृतीने उपस्थित शेतकरी, बैलजोडी मालक आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.मैदानात टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. यावेळीव्यासपीठावर उदघाटक म्हणून स्व.सौ.हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच कविता डांगे, शेतकरी मित्र परिवार आयोजन समितीचे ज्ञानेश्वरराव इंगळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय चौधरी,ट्रस्टचे पदाधिकारी मिलिंद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष वीरेंद्र लंगडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष विजय भुयार, गजानन कडू, संजय तायडे, अरविंद पंडित, प्रवीण अळसपुरे, जुनेद नवाब आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक विवेक गुल्हाने यांनी प्रास्ताविकातून शंकरपट आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, संत काशिनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शेतकरी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, बैलजोडी मालकांच्या कष्टांना मान मिळावा आणि ग्रामीण परंपरा जिवंत राहाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सर्व ग्रामस्थ, युवा शेतकरी मित्र परिवार आणि स्व. सौ. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्यामुळे हा शंकरपट यशस्वी होत असल्याचेही त्यांनी सांगितले तर सरपंच कविता डांगे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शंकरपट हा केवळ खेळ किंवा स्पर्धा नसून ग्रामीण समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. अशा कार्यक्रमांमुळे गावाची एकजूट वाढते, शेतकरी आणि बैलजोडी मालकांचा आत्मसन्मान उंचावतो आणि आपल्या संस्कृतीला नवी ऊर्जा मिळते.आयोजित करण्यात आलेला हा शंकरपट नांदगाव पेठच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीला अधिक बळ देणारा असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शंकरपटाच्या माध्यमातून शेतकरी संस्कृतीचा गौरव होत असून, नांदगाव पेठमध्ये हा सोहळा अनेक दिवस स्मरणात राहील, अशी भावना उपस्थित नागरिकांमधून व्यक्त होत होती. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतून तब्बल ६५ नामवंत बैलजोडी धारकांनी सहभाग नोंदविला.१५ उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. शिस्तबद्ध आयोजन, उत्कृष्ट बैलजोडी, स्पर्धेतील चुरस आणि प्रेक्षकांची मोठी गर्दी यामुळे नांदगाव पेठ परिसरात अक्षरशः यात्रेसारखे वातावरण पाहायला मिळाले. शेतकरी बांधव, युवक-युवती, महिला व वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेग, संतुलन आणि चालकांचे कौशल्य यांचा सुरेख संगमया विदर्भस्तरीय शंकरपटात सहभागी झालेल्या सर्व बैलजोडींनी उत्कृष्ट धाव घेत आपली ताकद, शिस्त आणि प्रशिक्षणाचे दर्शन घडवले. वेग, संतुलन आणि चालकांचे कौशल्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. प्रत्येक फेरीत बैलजोडींच्या दमदार धावींनी प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीचे, जिव्हाळ्याचे आणि परंपरेशी असलेल्या नात्याचे प्रतिबिंब या शंकरपटातून स्पष्टपणे दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी