
पुणे, 21 डिसेंबर (हिं.स.)तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीने वर्चस्व निर्माण केले आहे. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संतोष दाभाडे नऊ हजार ७९५ मतांनी विजयी झाले. त्यांनी दोन्ही अपक्ष उमेदवारांचा दारुण पराभव केला. नगराध्यक्ष भाजपचा असला तरी सर्वाधिक १७ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत.
तळेगावातील १४ प्रभागामधून २८ नगरसेवक निवडून द्यायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे दहा आणि भाजपचे नऊ असे १९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. नगराध्यक्षपदासह नऊ जागांसाठी मतदान झाले. नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये रविवारी मतमोजणी पार पडली. नगराध्यक्षपदाचे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे भाजपचे संतोष दाभाडे यांना २० हजार ४५६ , अपक्ष किशोर भेगडे यांना आठ हजार ७०१ आणि अपक्ष अॅड. रंजना भोसले यांना केवळ एक हजार ९६० मतांवर समाधान मानावे लागले. नोटाला ७२९ मते पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु