
रत्नागिरी, 21 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगर परिषदा आणि लांजा, गुहागर, देवरूख या तीन नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन आज निकाल जाहीर झाले. जिल्ह्यात मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. चार ठिकाणी शिवसेना, दोन ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळाले आहे.
खेड नगर परिषदेत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व २१ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. जिल्ह्यात भाजपने एकूण ३९ उमेदवार उभे केले होते, त्यांपैकी ३६ विजयी झाले असून, दोनपैकी दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. महायुतीमध्ये भाजपने नऊ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील सात जण विजयी झाले आहेत. रत्नागिरी शहरात महायुतीची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात पालकमंत्री आणि शिवसेना उपनेते उदय सामंत, भाजपचे अॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार शिल्पा सुर्वे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पालिकेच्या निवडणुकांचे थोडक्यात चित्र असे -
रत्नागिरी :
अध्यक्ष : शिल्पा सुर्वे (शिवसेना)
३२ पैकी २९ जागांवर महायुती, तीन जागांवर शिवसेना उबाठा
चिपळूण :
अध्यक्ष : उमेश सकपाळ (शिवसेना)
२८पैकी १६ जागांवर महायुती (शिवसेना ९, भाजप ७), पाच जागांवर शिवसेना उबाठा, तीन जागांवर काँग्रेस, दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
खेड :
अध्यक्ष : माधवी बुटाला (शिवसेना)
२० पैकी २० महायुती (१७ शिवसेना, तीन भाजप)
राजापूर :
अध्यक्ष : हुस्नबानू खलिफे (काँग्रेस)
२० पैकी १० जागा महाविकास आघाडीला, १० जागा महायुतीला
गुहागर :
अध्यक्ष : नीता मालप (भाजप)
१७ पैकी १३ शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एक, शिवसेना उबाठा एक, मनसे एक.
लांजा :
अध्यक्ष : सावली कुरूप (शिवसेना)
१७ पैकी नऊ शिवसेना, एक भाजप, एक शिवसेना उबाठा, सहा अपक्ष
देवरूख :
अध्यक्ष : मृणाल शेट्ये (भाजप)
१७ पैकी १० महायुती, तीन उबाठा, चार अपक्ष.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी