
ठाणे, 21 डिसेंबर (हिं.स.)।
धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने संघर्ष करणारी एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी आपल्या संघटनेतील सर्व जिल्हाप्रमुख, पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. हा भव्य सोहळा ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
या ऐतिहासिक पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पक्षप्रवेशाच्या वेळी माधवभाऊ गडदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धनगर समाजाची परंपरागत ओळख असलेली घोंगडी देऊन सत्कार केला,
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माधवभाऊ गडदे म्हणाले की, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यशवंत सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये धनगर समाजाने शिवसेनेला भरभरून मतदान केले. परिणामी शिवसेनेचे आमदार व खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ते पुढे म्हणाले की, धनगर समाजाचे आरक्षण, शिक्षण, रोजगार, विकास व सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आतापर्यंत अनेक सरकारे आली आणि गेली; मात्र सर्वच पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारे, कष्टकरी समाजाशी नाळ जपणारे नेतृत्व असून ते धनगर समाजाला निश्चितच न्याय देतील, असा ठाम विश्वास आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंत सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करताना सांगितले की, शिवसेना नेहमीच वंचित, उपेक्षित व संघर्ष करणाऱ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. धनगर समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक, ठोस व कालबद्ध निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे राज्यातील धनगर समाजाच्या संघटित राजकीय चळवळीला नवे बळ मिळाले असून, यशवंत सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. आगामी महापलिका निवडणूक राजकारणावर या घडामोडींचे दूरगामी परिणाम दिसून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर