
रायगड, 22 डिसेंबर (हिं.स.)।
पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने कंबर कसली असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या एकूण २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या निवडणुकीत एकूण ५,५४,५७८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७२ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश असून, सर्वसमावेशक लोकशाहीचे हे महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे. पुरुष, महिला तसेच तृतीयपंथीय मतदारांसाठी स्वतंत्र व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.
निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाकडून सक्षम मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी ६ निवडणूक निर्णय अधिकारी, ६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सुमारे ४,५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांची आखणी, मतदार यादी अद्ययावत करणे, ईव्हीएम व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि आचारसंहितेची अंमलबजावणी याबाबत सखोल नियोजन करण्यात आले आहे.
मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला असून, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
पनवेल महानगरपालिकेची ही निवडणूक शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके