
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या वतीने दिला जाणारा “अपरांतरत्न” पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे महाधिवक्ता ॲड. मिलिंद साठे यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार येत्या शनिवारी (दि. २७ डिसेंबर) समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.विशेष म्हणजे हा सन्मान लाभलेले मिलिंद साठे हे अपरांतभूमीतील महाधिवक्तापद भूषविणारे पहिले व्यक्तिमत्त्व आहे.
जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बाबासाहेब परुळेकर यांच्या हस्ते होणाऱ्या त्यांच्या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान चिपळूणच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे भूषविणार आहेत. या अभिमान सोहळ्याप्रसंगी ज्या व्यक्ती आणि संस्थांना ॲड. मिलिंद साठे यांचा सत्कार करायचा आहे त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९०६७३७५७३८ येथे संपर्क साधावा.
या विशेष समारंभास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी