
रायगड, 22 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसला समाधानकारक यश मिळाले असून, या निकालातून आगामी राजकीय लढ्याची दिशा स्पष्ट झाली आहे. हुकूमशाहीविरोधात आणि संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येऊन मोठ्या ताकदीने लढण्याची वेळ आली आहे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सुप्रिया पाटील व चित्रलेखा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी भवन, अलिबाग येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त करताना सांगितले की, तीन जागा वगळता महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असून ही निवडणूक परिवर्तनाची नांदी ठरली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा उच्च शिक्षित असून अनेक भाषांवर प्रभुत्व असलेली, कार्यक्षम आणि विकासाभिमुख आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
शेकापची बांधिलकी ही गोरगरीब, शेतकरी व कष्टकऱ्यांशी असून जनतेचे सेवक या भावनेतून काम करण्याची आवश्यकता आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. संविधान व लोकशाही टिकवण्यासाठीच महाविकास आघाडीची निर्मिती झाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी एकत्र येत ताकदीने लढावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कार्याचे कौतुक केले. अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम झाले असून भविष्यात वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि शहरी विकासावर विशेष भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला शेकाप व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला, तरुण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके