
परभणी, 22 डिसेंबर (हिं.स.)।जिंतूर येथील हिदायत नगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एक बालक गंभीर जखमी झाले असून इतर दोन बालकांनाही दुखापत झाली आहे.
हिदायत नगर वसाहतीतील शे. रिजवान शे. हुसेन (वय 6 वर्षे), सय्यद तैमूर सय्यद फेरोज (वय 5 वर्षे) आणि जुनेरा तोफीक कुरेशी (वय 1 वर्ष) ही तीन चिमुकली मुले आपल्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी परिसरातील मोकाट भटक्या कुत्र्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात शे. रिजवान याच्या डोक्याला कुत्र्याने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला, तर उर्वरित दोन बालकांनाही किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या.
बालकांचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नाने कुत्र्यांच्या तावडीतून या बालकांची सुटका केली. जखमी तिन्ही बालकांना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेनंतर हिदायत नगरसह संपूर्ण जिंतूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे लहान बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, निर्बिजीकरण व नसबंदी करून मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis