मनसे-ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर
मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला असून, अनेक प्रभागांतील तिढे हळूहळू सुटत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील बहुतांश प्रभागांमध्ये दो
MNS and  Thackeray group


Raj  Uddhav Thackeray


मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला असून, अनेक प्रभागांतील तिढे हळूहळू सुटत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील बहुतांश प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांमधील जागावाटप आधीच पूर्ण झाले असले तरी दादर, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी परिसरातील काही प्रभागांवरून मतभेद कायम होते.

सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 याबाबतचा तिढा अखेर सुटला. या बैठकीत शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटासाठी तर एक प्रभाग मनसेसाठी सोडण्यावर एकमत झाले. या चर्चेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करून शिवडीतील जागावाटप निश्चित केले.

शिवडीचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर आता मातोश्रीवर भांडूप, विक्रोळी, दादर आणि माहीम परिसरातील प्रभागांबाबत चर्चा सुरू आहे. विक्रोळी आणि भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 109, 110, 114 आणि 115 या चार जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. तसेच दादर आणि माहीममधील वॉर्ड क्रमांक 192, 193 आणि 194 या तीन वॉर्डवरही ठाकरे गट आणि मनसे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विशाखा राऊत आणि अनिल देसाई मातोश्रीवर उपस्थित असून, आमदार सुनील राऊत आणि खासदार संजय दिना पाटील हे मनसेचे बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांच्यासोबत सखोल चर्चा करत आहेत.

उर्वरित जागावाटप अंतिम होऊन मनसे आणि ठाकरे गटाकडून अधिकृत युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही युती लवकरच जाहीर होऊ शकते. युती जाहीर करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मेळाव्याचे नियोजन दोन्ही पक्षांकडून सुरू असून, गोरेगाव नेस्को, बांगुर नगर मैदान गोरेगाव आणि वरळी डोम या ठिकाणांची चाचपणी करण्यात येत आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. या वॉर्डवरून ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत, तर मनसेकडून माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांना ही जागा सोडू नये, अशी भूमिका घेतली जात आहे. अनिषा माजगावकर 2012 मध्ये याच वॉर्डमधून नगरसेविका झाल्या होत्या, तर 2017 मध्ये रमेश कोरगावकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 114 अखेर कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande