
जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.)नगरपालिका निवडणुकीत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना जोरदार धक्का बसला असून त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादी (शप) गटाच्या गायत्री भंगाळे या विजयी झाल्या असून येथे भाजपाला सुरुंग लागला आहे. माजी आमदार संतोष चौधरी, अनिल चौधरी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
भाजपाला सुरुंग लावण्यात चौधरी बंधूंना यश आले आहे, तर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा करिष्मा देखील भंगाळेंच्या विजयासाठी पुरक ठरला आहे. मंत्री संजय सावकारे यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेल्याने ते जमिनीवर नव्हते, मात्र भुसावळकरांनी त्यांना जमिनीवर आणले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमृत योजनेचे काम रखडल्यामुळे भुसावळकर नाराज होते त्याचा फटका सावकारे यांना बसला. एकनाथ खडसे यांची मोठा मतगठ्ठा तेथे असल्याने त्याचा फायदा झाला आहे. अनेक वर्षांनी भुसावळात चौधरी बंधूंचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
भुसावळ नगरपालिका निवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून या निवडणुकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना जोरदार राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा दारुण पराभव झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या गायत्री भंगाळे यांनी थेट विजय मिळवत भाजपाच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावला आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, प्रतिष्ठेची लढाई ठरली होती आणि त्यात भाजपाला मोठी नामुष्की पत्करावी लागली आहे.
या निवडणुकीकडे माजी आमदार संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांनी अत्यंत गांभीर्याने पाहिले होते. चौधरी बंधूंनी ही लढत ‘करो या मरो’ अशी मानत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रचारापासून ते मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याच्या रणनीतीपर्यंत त्यांनी आखलेली खेळी यशस्वी ठरली. अखेर अनेक वर्षांनंतर भुसावळच्या राजकारणात चौधरी बंधूंचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर