जळगाव -नगरपालिकेचा निकाल गुलाबराव पाटील यांच्यासाठी राजकीय इशाराच
जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.)धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतून राजकारणात महत्त्वाचा संदेश देणारा निकाल समोर आलो. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वतःच्या तालुक्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जळगाव -नगरपालिकेचा निकाल गुलाबराव पाटील यांच्यासाठी राजकीय इशाराच


जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.)धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतून राजकारणात महत्त्वाचा संदेश देणारा निकाल समोर आलो. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वतःच्या तालुक्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार मुसंडी मारत सत्तास्थानावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महायुतीच्या उमेदवार विणा भावे यांचा पराभव हा केवळ एका नगरपालिकेचा निकाल नसून, तो सत्ताधारी गटातील अंतर्गत विसंवाद, स्थानिक असंतोष आणि बदलाची जनभावना यांचे प्रतिबिंब मानले जात आहे. धरणगाव ही पालकमंत्र्यांची राजकीय कर्मभूमी होय, त्यामुळे येथील निवडणूक गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई ठरली होती. त्यांच्या पुढाकारातून येथे महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात आली.

भाजप, शिंदे गट आणि इतर घटक एकत्र येऊन ताकद दाखवतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने ही अपेक्षा फोल ठरवली. महायुतीने एकसंघपणे काम केले नसल्याचे या पराभवातून स्पष्टपणे समोर आले आहे. या निकालामागे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्थानिक नागरी प्रश्न होते. धरणगाव शहरात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था यासारखे मूलभूत प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडे राज्यस्तरीय ताकद असतानाही शहरातील प्रश्न सुटले नाहीत, ही भावना नागरिकांमध्ये खोलवर रुजली होती. ‘सत्ता असूनही विकास का नाही?’ हा प्रश्न मतदारांच्या मनात घर करून होता. त्यातूनच परिवर्तनाची गरज अधिक तीव्र झाली. शिवसेना (उबाठा) गटाने नेमकी हीच असंतोषाची नस पकडली. त्यांनी प्रचारात स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. केवळ भावनिक किंवा पक्षनिष्ठेवर आधारित राजकारण न करता, ‘शहरासाठी काय केले आणि काय राहिले’ याचा हिशेब मतदारांसमोर मांडला. परिणामी मतदारांनी सत्ताधाऱ्यांना धक्का देत विरोधकांना संधी दिली.

महायुतीच्या पराभवामागे अंतर्गत नाराजीही मोठे कारण मानले जात आहे. उमेदवारी वाटप, प्रचारातील समन्वयाचा अभाव आणि स्थानिक कार्यकर्त्यांमधील असमाधान हे घटक निवडणुकीदरम्यान स्पष्टपणे दिसून आले. एकत्र लढत असल्याचे चित्र वरवर होते; मात्र तळागाळात एकजूट नव्हती. याचा थेट फटका उमेदवाराला बसला. हा निकाल गुलाबराव पाटील यांच्यासाठी राजकीय इशाराच म्हणावा लागेल. जिल्ह्यातील बलाढ्य नेते म्हणून त्यांची ओळख असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर मतदार आता अधिक सजग झाले आहेत. केवळ मंत्रीपद किंवा सत्ता यावर विश्वास न ठेवता, प्रत्यक्ष कामगिरीवर मतदान करण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात केवळ राजकीय समीकरणे जुळवून निवडणुका जिंकता येणार नाहीत, तर स्थानिक विकासाला प्राधान्य द्यावे लागेल, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande