
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : राजापूर येथील आबासाहेब मराठे आर्टस् ॲन्ड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेजमधील वनस्पती शास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रतीक दिलीप नाटेकर यांना पश्चिम घाटातील वनस्पती आणि काळी बुरशी (Black Mildew Fungi) यावरील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था (ट्रस्ट), कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा यांच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो.
डॉ. नाटेकर यांनी पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा सखोल अभ्यास करताना काळ्या बुरशीच्या (Black Mildew Fungi) नवीन १५ प्रजातींचा शोध लावला. तसेच ३ नवीन वनस्पती प्रजातींचा शोध घेऊन वनस्पतीशास्त्र व जैवविविधता संशोधन क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संशोधनामुळे वनस्पती, कवकशास्त्र, पर्यावरण संवर्धन व जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे.
याच महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक अतुल मंगल सुभाष टिके यांना लोकशाही सशक्तीकरणासाठी केलेल्या नवमतदार नोंदणी कार्यातील सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदानाबद्दल “राष्ट्रीय युवा प्रेरणा पुरस्कार” देण्यात आला. युवकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, नव मतदारांची नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवणे या कार्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात लोकशाही मूल्यांची जपणूक व जनजागृतीस चालना मिळाली आहे.
पुरस्कारांचे वितरण रविवार, दि. 21 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील रिजेंट हॉलमध्ये करण्यात आले. दोन्ही मान्यवरांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी