
अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.)महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या प्रचंड बाढली आहे. प्रत्येक पक्षात एका जागेसाठी पाच ते सहा उमेदवार दावा करीत असल्याने उमेदवारी मिळाली तर ठीक, अन्यथा अपक्षाचा मार्ग धरू, असा थेट इशारा इच्छुकांकडून दिला जात आहे.
पाऊणे चार वर्षांनंतर महानगरपालिका निवडणूक होत आहे. २३ डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरू होईल. इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कुणी या पक्षाकडे तर कुणी त्या पक्षाकडे फिल्डींग लावणे सुरू केले आहे. ज्या संभाव्य उमेदवारांना पक्षाने काम करण्याचे आदेश दिले, त्यांनी जनसंपर्क सुरू केला आहे. त्यामुळे या पक्षात आपली उमेदवारी निश्चित होणे संभव होत नसल्याचे पाहत अनेकांनी अन्य पक्षाकडूनही तिकीट मागण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.
तर दुसरीकडे संभाव्य बंडखोरीचा भडका उडू नये म्हणून पक्षांनी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र, या विलंबामुळेच पक्षांतर्गत असंतोष अधिकच चिघळत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची गर्दी वाढत असून, तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी अनेकांनी केली आहे. काहींनी थेट पक्षांतराचा पर्यायही खुला ठेवला असून, पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. इच्छुकांची संख्या वाढल्याने बंडखोरी अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. बैठका, भेटीगाठी, गुप्त चर्चा यांचा सपाटा सुरू असून, पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत.
दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी पक्षांनी महानगरपालिकेची सत्ता आपल्या हाती खेचण्यासाठी अंतर्गत - समीकरणे, जातीय-प्रादेशिक गणिते व राजकीय रणनीती आखण्यास वेग दिला आहे. माजी नगरसेवक पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाले असून, या वेळी तिकीट नाही तर थेट जनतेत जाणार, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत फुटीचे राजकारण उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शहरातील प्रत्येक प्रभागात राजकीय हालचालींना उधाण आले आहे. माजी नगरसेवक जनसंपर्क, बैठका व प्रचार मोहिमा वेगाने राबवत आहेत. विशेषतः युवा उमेदवार सोशल मीडियावर आक्रमक प्रचार करीत आहेत. नवोदितांनी स्वतंत्र संघटनात्मक फळी उभी करण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिका निवडणूक आता केवळ निवडणूक न राहता सत्तेसाठीचा संघर्ष, बंडखोरी आणि राजकीय उलथापालथींचे रणांगण ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत,
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी