सोलापूर : मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांची आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
सोलापूर, 22 डिसेंबर (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत दि. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी निश्चित करावयाच्या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने रविवारी राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सायंका
सोलापूर : मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांची आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न


सोलापूर, 22 डिसेंबर (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत दि. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी निश्चित करावयाच्या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने रविवारी राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सायंकाळी 5 वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या दालनात पार पडली.

या बैठकीमध्ये मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध सूचना व अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रांची उपलब्धता, नागरिकांची सोय, प्रवेशयोग्यता तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित बाबींवर राजकीय पक्षांनी मते मांडली. या सूचनांचा विचार करून पुढील टप्प्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले.

तसेच पक्ष प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या इतर मुद्द्यांच्या अनुषंगाने जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणी महापालिकेमध्ये कार्यरत असल्यास त्यांनी प्रचार सभांमध्ये किंवा प्रचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा सहभाग घेऊ नये. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. निवडणुकीदरम्यान एखाद्या व्यक्तीने दोन ठिकाणी मतदान केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande