
अमरावती, 23 डिसेंबर (हिं.स.) | देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुउद्देशीय संस्था, अमरावती जिल्हा अॅथलेटिक संघटनेच्या विद्यमाने २५ डिसेंबरला अमरावती शहरात राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य आयोजक गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार भारतीय यांनी दिली.
राज्यस्तरीय अटल दौडला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी २११५ जणांनी नावे नोंदवली आहे. मंगळवार पर्यंत नावे नोंदविण्यात येणार आहे. २५ डिसेंबरला सकाळी ६ वाजता नेहरू मैदान येथून हाफ मॅरेथॉन सुरू होईल. तेथून राजकमल, राजापेठ अंडर बायपास, कंवर नगर, कल्याण नगर, मोतीनगरी, प्रशांत नगर, राजेंद्र कॉलनी, काँग्रेस नगर, जिल्हाधिकारी कार्यालय, गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी चौक, शेगाव नाका, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, जवाहर गेट, गांधी चौक, भुतेश्वर चौक, सिलांगण रोड, नंदा मार्केट, नवाथे चौक वरून राजकमल चौक येथून नेहरू मैदान येथे समारोप होईल.
असे राहतील वयोगट
या स्पर्धेतील वयोगट पुढीलप्रमाणे आहेत : १४ वर्षांखालील (मुले/मुली - ३ किमी), १६ वर्षांखालील (मुलांकरिता पाच किमी, मुलींकरिता तीन किमी), २० वर्षांखालील (मुलांकरिता ८ किमी, मुलींकरिता पाच किमी), ४० वर्षांखालील (महिलांकरिता पाच किमी), ४५ वर्षांखालील (पुरुषांकरिता ८ किमी), खुला वयोगट, पुरुष व महिला १० किलोमीटर, खुला वयोगट पुरुष व महिला २१ किलोमीटर याप्रमाणे राहील. पाच ठिकाणी मेडिकल टीमची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच अॅम्बुलन्सही राहील. याकरिता डॉ. शाम राठी, डॉ. जयंत पांढरीकर , डॉ मिलिंद पाठक हे उपस्थित राहतील २१ किलोमीटर स्पर्धेमध्ये प्रथम येणार्या विजेताला बाईक पुरुष गटात आणि मोपेड महिला गटात देणार आहे त्यासोबत इतर विजेत्यांना एकूण पाच लाखांची बक्षीसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येकाला टी-शर्ट दिले जाईल.
या मान्यवरांची राहणार उपस्थिती
मॅरेथॉन स्पर्धेला खा. डॉ. अनिल बोंडे, माजी आ. प्रवीण पोटे, आ. प्रताप अडसड, निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष नितीन धांडे, किरणताई महल्ले, जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, किरण पातूरकर, प्रा. रवी खांडेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेला माजी महापौर चेतन गावंडे, प्रशांत शेगोकर , प्रा. अतुल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी