
रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। आगरी समाज संस्था यांच्या माध्यमातून तसेच श्री मरुबाई मंदिर ट्रस्ट व अष्टमुद्रा प्रतिष्ठान, मुंबई यांच्या विद्यमाने बेलोशी गावात महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन माझेरी विभाग आगरी समाज यांच्या वतीने करण्यात आले होते. बेलोशी येथील श्री जरीमरी मंदिरात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून परिसरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. समाजातील एकतेचे महत्त्व, भविष्यातील संभाव्य संकटांची जाणीव आणि आगरी समाजाची कष्टकरी परंपरा यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. समाजाने एकत्रित राहून परस्पर सहकार्याची भावना जपली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
यानंतर मधुकर गावंड यांनी समाजाच्या एकीवर भर देत आगरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आगरी समाज संस्थेसोबत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. अनिल गावंड यांनी मरुबाई देवीचे महात्म्य विशद करत समाज प्रगतीच्या मार्गावर कसा वाटचाल करू शकतो, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी बेलोशी गावचे सरपंच कृष्णा भोपी तसेच जयवंत थळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सध्या मोठ्या प्रमाणात समाज आगरी समाज संस्थेशी जोडला जात असल्याचे सांगितले. शशिकांत मिठागरी यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत विवाहमिलन वधू-वर परिचय केंद्रामध्ये १२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विवाहोच्छुक मुलींची मोफत नोंदणी करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद भोपी यांनी केले. या कार्यक्रमाला आगरी समाज संस्थेचे सचिव प्रभाकर ठाकूर, मनोहर पाटील, ज्येष्ठ सल्लागार अनंत म्हात्रे, प्रकाश मिठागरी, श्रेयस ठाकूर, निलेश वारगे, जगदिश भोपी, सुभाष वारगे, द्वारकानाथ गुंड, हरिश्चंद्र भोपी, राकेश भोपी, रणधीर मढवी, विलास वारगे, संतोष भोपी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा साडी वाटप कार्यक्रम ग्रामीण भागातील महिलांसाठी आनंददायी ठरला असून उपस्थित महिलांनी व ग्रामस्थांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके