रत्नागिरी तालुक्यात एकाच दिवशी ५०० वनराई बंधारे
रत्नागिरी, 23 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी पंचायत समितीने आज एका दिवसात मिशन बंधारे उपक्रमांतर्गत ९५ ग्रामपंचायतींमध्ये पाचशेहून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम पार पाडली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आण
कोतवडे येथील वनराई बंधारा


रत्नागिरी, 23 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी पंचायत समितीने आज एका दिवसात मिशन बंधारे उपक्रमांतर्गत ९५ ग्रामपंचायतींमध्ये पाचशेहून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम पार पाडली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी चेतन शेळके यांच्या नेतृत्वाखाली आज एकाच दिवशी 95 ग्रामपंचायतींमध्ये पाचशेहून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत कोतवडे गावच्या घारपुरेवाडीत वेतोशी नदीवर सकाळी ९ वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात झाली. कोतवडे गावच्या घारपुरेवाडीत बचतगट महिलांच्या लक्षणीय आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून वेतोशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्यांकरिता सरपंच संतोष बारगुडे, ग्रामपंचायत अधिकारी देवीदास इंगळे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मयेकर, दिया कांबळे, अनुजा धावळे, कृषी अधिकारी व्ही. एस. कोडलकर, सुनील घारपुरे, बचतगटाच्या सीआरपी समृद्धी सोनार, सुरभी शितप यांच्यासह बचतगटाच्या महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

वेतोशी नदीतील पाणी वाहून पुढे जात होते. त्यामुळे त्याचा गावाला फारसा फायदा होत नव्हता. या मोहिमेअंतर्गत नदीवर वनराई बंधारा बांधल्याने त्याचा दृश्यपरिणाम तात्काळ दिसून आला. बंधाऱ्याच्या अलीकडे जलसाठ्यात लगेचच झालेली वाढ दिसून आली. हा जलसाठा गावच्या फायद्यासाठी विशेषतः शेतीसाठी, प्राणीमात्रांसाठी वा अन्य कामांसाठी आता उपयोगात येणार आहे.तालुक्यातील इतर ठिकाणीही स्थानिक महिला बचत गट, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतींच्या मदतीने बंधारे बांधण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande