रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे देवरूखला उद्घाटन
रत्नागिरी, 23 डिसेंबर, (हिं. स.) : त्रेपन्नाव्या रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आज देवरूखला उद्घाटन झाले. विकसित व आत्मनिर्भर भारत विषयांतर्गत ११७ मॉडेल्स प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, देवरूख येथील न्यू इंग्लिश स
५३ व्या रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे देवरूखला उद्घाटन


रत्नागिरी, 23 डिसेंबर, (हिं. स.) : त्रेपन्नाव्या रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आज देवरूखला उद्घाटन झाले. विकसित व आत्मनिर्भर भारत विषयांतर्गत ११७ मॉडेल्स प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूल देवरुख आणि गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि सृजन इन्होव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आज सकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

यावेळी रत्नागिरी शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, संगमेश्वर गटशिक्षणाधिकारी विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, श्री. नाईक, शशिकांत त्रिभुवणे, शिरीष फाटक, नेहा फाटक, श्री. भोसले, सृजन सायन्स सेंटरचे व्यवस्थापक चंद्रशेखर केदारी, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष अयुब मुल्ला, रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ अध्यक्ष सुदेश कदम आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.सकाळी देवरूख शहरातून प्रदर्शन सेंटरपर्यंत विज्ञान दिंडी काढण्यात आली. उद्घाटनानंतर परीक्षकांकडून प्रतिकृतींचे परीक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

विकसित आणि आत्मनिर्भर भारत या विषयांतर्गत या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांची बहूपयोगी सौरचाळणी, सौरधान्य वारवणी यंत्र, सौरचूल, सोलर ग्रास कटर, स्वच्छतेची ट्रिंग... ट्रिंग... अशा विविध वैज्ञानिक प्रतिकृती व मॉडेल या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेल, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन अशा अनेक गोष्टीवर या प्रदर्शनातून जागृती व सखोल माहिती दिली जात आहे.

प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी २७, माध्यमिक विद्यार्थी २७, दिव्यांग प्राथमिक विद्यार्थी ९, दिव्यांग माध्यमिक विद्यार्थी ९, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक प्रत्येकी १८ व प्रयोगशाळा सहाय्यक ९ अशी एकूण ११७ मॉडेल्स मांडण्यात आली आहेत. प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी एकूण ९ संघांनी सहभाग घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande