अकोला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची धावपळ !
अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार नामनिर्देशन प्रक्रियेसाठी महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयांमध्ये तसेच मुख्य महानगरपालिका कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांब
अकोला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची धावपळ !


अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार नामनिर्देशन प्रक्रियेसाठी महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयांमध्ये तसेच मुख्य महानगरपालिका कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांबाबत कुठेही एकसमान व स्पष्ट माहिती मिळत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

कुठल्या झोनमध्ये पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट आवश्यक आहे असे सांगितले जात आहे, तर दुसऱ्या झोनमध्ये ते आवश्यक नसल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हिट) करण्यास सांगितले जात आहे, तर काही अधिकारी साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र पुरेसे आहे असे सांगत आहेत.

त्याचप्रमाणे, शौचालय प्रमाणपत्र

मालमत्ता कर / कर भरणा प्रमाणपत्र

नळ कनेक्शन प्रमाणपत्र

ठेकेदार प्रमाणपत्र या कागदपत्रांबाबतही प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी माहिती दिली जात आहे. काही ठिकाणी याबाबत कोणतीही ठोस सूचना दिली जात नाही.

या विसंगत माहितींमुळे उमेदवार आणि त्यांचे प्रस्तावक अक्षरशः त्रस्त झाले असून, दिवसभर कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. चारही झोनमध्ये वेगवेगळी माहिती आणि मुख्य महानगरपालिका कार्यालयात वेगळीच माहिती मिळत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती

अकोला महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुयोग्य अंमलबजावणीसाठी उमेदवारांकडून जोरदार मागणी करण्यात येत आहे की, निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने अधिकृत प्रेस नोट किंवा परिपत्रकाद्वारे खालील बाबी स्पष्ट कराव्यात :

उमेदवारांना नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत

प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर करायचे की साध्या कागदावर

पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट आवश्यक आहे की नाही

कोणकोणत्या विभागांची NOC (ना हरकत प्रमाणपत्र) आवश्यक आहे

सर्व झोनसाठी एकसमान नियम व वेळापत्रक

वेळेत आणि स्पष्ट माहिती दिल्यास उमेदवारांचा अनावश्यक त्रास टळेल, तसेच निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व विश्वासार्ह बनेल, अशी अपेक्षा उमेदवार आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande