
अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवेतून सुशासन साकार होते. त्यामुळे केवळ उपक्रमापुरतेच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देऊन सुशासन निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी, असे प्रतिपादन निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर यांनी आज येथे केले. सुशासन आठवड्यानिमित्त कार्यशाळा नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. भूमी अभिलेख अधिक्षक भारती खंडेलवाल, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी श्री. परंडेकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसंदर्भात नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने ‘प्रशासन गावाच्या दिशेने’ हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन कामे पारदर्शक व जलदरीतीने व्हावीत. प्रत्येक विभागाने आपले सरकार, सीपी ग्राम पोर्टल व पीजी पोर्टलवर आलेल्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण तत्काळ करण्याचे आवाहन श्री. परंडेकर यांनी केले,
सुशासन सप्ताहामध्ये प्रशासन गावाच्या दिशेने उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचे लाभ शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवले जात आहेत. सुशासन सप्ताहाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वर्षभर नागरिकांच्या तक्रारीचे निरसन जलद गतीने करण्याचे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले. श्रीमती खंडेलवाल यांनी विभागाच्या गुड गव्हर्नन्स उपक्रमाबाबत सादरीकरण केले. सार्वजनिक बांधकाम मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना विभाग यांनी अभिलेख व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण उपक्रम बाबत सादरीकरण केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे