
अमरावती, 23 डिसेंबर (हिं.स.)
अमरावती महानगरातील आरोग्य भारती आणि श्री अंबादेवी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती शहरातील वंचित मुलांसाठी दादाची शाळा हा उपक्रम राबविला जाणार आहे . या अभिनव उपक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बालरोग तज्ञ डॉ.जयंत पांढरीकर , माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार दासरवाड, दादाची शाळा चे संचालक अभिजीत पोखरणीकर व डॉक्टर आशिष डगवार उपस्थित होते.
शहरात राहणाऱ्या वंचित मुलांसाठी त्यांना आश्रय मिळावा व त्यांचे भविष्य सुकर व्हावे यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दादाची शाळा ची मुहूर्त मेढ रोवणारे अभिजीत पोखरणीकर यांच्या मार्गदर्शनात रोहन शेंडे आणि मित्रपरिवार यांच्यातर्फे दादाची शाळा हा उपक्रम राबविला जाणार आहे. दादाची शाळा या उपक्रमाला आपला भरभरून आशीर्वाद असून असे कार्य हाती घेतल्याबद्दल पद्मश्री डॉक्टर शंकर बाबा पापळकर यांनी आरोग्य भारतीचे कौतुक केले. तर दादाची शाळा चालवणे हा उपक्रम सोपा नसून त्यासाठी रोहन शेंडे व त्यांच्या टीमला प्रयत्न करावे लागतील असे आवाहन अभिजीत पोखरणीकर यांनी केले. आजच्या तरुणाईला योग्य दिशा किंवा मार्ग दाखविला तर ते कोणतेही काम यशस्वी करू शकतात त्यामुळे दादाची शाळा हा उपक्रम चालविण्यासाठी रोहन शेंडे व त्याच्या मित्र परिवारांसोबत आरोग्य भारती उभी राहील असे आवाहन गॅलक्सी सर्जिकल आणि लॅप्रोस्कोपी हॉस्पिटलचे संचालक व आरोग्य भारतीचे महानगर अध्यक्ष डॉ. आशिष डगवार यांनी केले.
या कार्यक्रमाला आरोग्य भारतीचे सचिव प्रसाद बनसोड, राजेश कोल्हे, डॉ. कौशिक जोशी ,डॉ.मंगेश कोल्हटकर, डॉ. राजेंद्र साठे ,डॉ.अश्विनी सहस्रबुद्धे, शैलेश पोतदार, सुनील सरोदे, चंद्रशेखर भोंदू, सुनील खराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
---
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी