राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत भाजप अव्वल
-महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचा दबदबा कायम मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.) । महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पार्टीने (भाजप) अभूतपूर्व यश संपादन करत पुन्हा एकदा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे
महाराष्ट्र भाजपा के अध्यक्ष रविंद्र चव्हान और भाजपा के अन्य पदाधिकारी जित का जश्न मनाते हुए


-महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचा दबदबा कायम

मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.) । महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पार्टीने (भाजप) अभूतपूर्व यश संपादन करत पुन्हा एकदा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वासह भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्य, अचूक रणनीती आणि प्रभावी नेतृत्वाचा हा विजय मानला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांत भाजपाने राज्यभर लक्षणीय कामगिरी करत अनेक नगरपरिषद व नगरपंचायतींवर वर्चस्व मिळवले. निवडणूक प्रचारादरम्यान गाजलेले “तुमची आमची भाजपा, सर्वांची” हे घोषवाक्य जनतेने प्रत्यक्षात उतरवले असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते, असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत रविंद्र चव्हाण यांनी अत्यंत शिस्तबद्ध, संयमित आणि आक्रमक अशा अनोख्या कार्यशैलीत संपूर्ण महाराष्ट्रात संघटन मजबूत केले. या कालावधीत विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत त्यांनी पक्षाची ताकद वाढवली. कोकणात प्रभाव असलेल्या चव्हाण यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी या निवडणुकांत लागली असून, ते या परीक्षेत पूर्ण गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे निकालांवरून दिसून येते.

राज्यात अनेक ठिकाणी भाजपची लढत शिंदेसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशी होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चातुर्यामुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे भाजपाने अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विजय मिळवला. त्याचवेळी महायुतीतील सत्तासंतुलन बिघडू नये, याचीही काळजी दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या निवडणुकांतून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेतृत्वाला भाजपाने स्पष्ट संदेश दिल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यातील राजकीय संबंध, अलीकडील पक्षप्रवेशांमुळे अधिक गुंतागुंतीचे होतील का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

जानेवारीत अपेक्षित असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांची ही युती निर्णायक ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या पार्श्वभूमीवर महायुतीतील सहकारी पक्ष आपली पुढील रणनीती कशी आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande