
छत्रपती संभाजीनगर, 23 डिसेंबर (हिं.स.)। ग्राम,तालुकास्तरावरील अधिकारी – कर्मचारी हेच प्रशासनाचा चेहरा असतात. आपल्या संभाषणानुसार आपली वैयक्तिक नव्हे तर प्रशासनाचीही प्रतिमा जनमानसात तयार होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य अवश्य वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी येथे केले.
छत्रपती संभाजीनगर, पैठण व फुलंब्री येथील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर हे उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, नीलम बाफना, तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे, श्रीमती योगिता खटावकर, उमेश पाटील, ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अनिल सुर्यवंशी, सतिष भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, प्रशासकीय यंत्रणेला अद्यावत तंत्रज्ञान, कायद्यातील बदल, सामजिक बदल यानुसार करावयाचे प्रशासकीय कामकाज याबाबत प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जावे. दैनंदिन कामकाजात होणाऱ्या लहान लहान चुका यातून टाळता येतील. त्यासाठी नागरिकांशी साधावयाचे संवाद याबाबत कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.
प्रमुख मार्गदर्शक संजय कुंडेटकर यांनी उपस्थितांना महसूली कायदे, गाव पातळीवर द्यावयाच्या सेवा, विविध दाखले, परवानग्या याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis