
गडचिरोली., 23 डिसेंबर (हिं.स.)
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ करून त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याच्या उद्देशाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्हा प्रशासन व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील इयत्ता ५ वी ते १० वी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मेवाटप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला एसिलोर लक्सॉटिका फाउंडेशनचे तांत्रिक व कार्यान्वयन सहकार्य लाभणार आहे.
‘सर्वांसाठी दृष्टी : जिल्हास्तरीय माध्यमिक शाळा नेत्र तपासणी व चष्मेवाटप कार्यक्रम’ असे या उपक्रमाचे नाव असून, विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या दृष्टीतील अपवर्तन दोषांची वेळेत ओळख करून त्यावर तात्काळ उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दृष्टीदोष ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम करणारी, मात्र सहज दुरुस्त करता येणारी समस्या असल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
जिल्हाभर सर्वसमावेशक अंमलबजावणीसामंजस्य करारानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची नियोजनबद्ध नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शासकीय तसेच जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षित नेत्र तपासणी तज्ज्ञांच्या माध्यमातून होणार आहे. तपासणीदरम्यान दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार खास तयार केलेले चष्मे मोफत वितरित करण्यात येणार आहेत.
हा उपक्रम पूर्णतः सेवाभावी स्वरूपाचा असून त्यासाठी आवश्यक १०० टक्के निधी स्वयंसेवी संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चष्म्यांच्या चौकटी, काचा, निर्मिती, पॅकिंग व वितरणाचा संपूर्ण खर्च रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट करणार आहे. एसिलोर लक्सॉटिका फाउंडेशन या उपक्रमासाठी तांत्रिक मार्गदर्शन, गुणवत्ता नियंत्रण व कार्यान्वयन सहकार्य देणार असून, जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ व प्रशासकीय समन्वय उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कराराअंतर्गत कोणताही जिल्हा प्रशासनावर कोणताही आर्थिक भार असणार नाही.
शैक्षणिक समतेसाठी आदर्श भागीदारी
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर दृष्टीसंबंधी अडचणी दूर करून त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व शिक्षण यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम सार्वजनिक प्रशासन व सेवाभावी संस्थांमधील आदर्श भागीदारीचे उदाहरण ठरणार असून, इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond