
नाशिक, 23 डिसेंबर (हिं.स.)। - नाशिक महानगरपालिका प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता व उत्तरदायित्व अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी काल सातपूर विभागातील विविध भागांना अचानक भेटी देत अतिक्रमणविषयक तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांनी अॅनलाईन प्रणालीद्वारे नोंदवलेल्या तक्रारींवर | प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा आयुक्त खत्री यांनी यावेळी घेतला. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी तक्रार प्राप्त ठिकाणी स्वतः जाऊन अतिक्रमणांची सद्यस्थिती तपासली. प्रशासकीय अहवाल व प्रत्यक्ष परिस्थिती यांची पडताळणी करून कार्यवाहीची परिणामकारकता सुनिश्चित करण्यात आली. तक्रार निवारण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कोणतीही तक्रार 'क्लोज' करण्यापूर्वी संबंधित नागरिकाचा समाधानकारक अभिप्राय घेणे बंधनकारक राहणार आहे.सातपूर विभागातील प्रलंबित अतिक्रमण तक्रारींवर कोणतीही दिरंगाई न करता तातडीने व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.पाहणी दरम्यान आयुक्तांनी स्थानिक नागरिकाशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासन नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत असून त्यावर वेळेत कार्यवाही केली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. भविष्यातही विविध नागरी समस्यांबाबत अशा प्रकारच्या अचानक क्षेत्रभेटी नियमितपणे केल्या जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नाशिककरांना तत्पर, पारदर्शक व दर्जेदार सेवा देणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. केवळ कागदोपत्री तक्रारी निकाली न काढता, नागरिकांचे प्रत्यक्ष समाधान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांचा फीडबॅक घेतल्याशिवाय तक्रार बंद न करण्याच्या निर्णयामुळे प्रशासकीय उत्तरदायित्व अधिक मजबूत होईल, असे यावेळी मनपाच्या आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV