
नाशिक, 23 डिसेंबर (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोडला आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत असून प्रस्तावित असलेला बाह्य रिंग रोडला शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला आहे. त्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
मातोरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती वाहतूक व गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रिंगरोडला मातोरीसह परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या रिंग रोडमुळे बेळगाव डगा, दुगाव, मुंगसरे, मातोरी, दरी, मखमलाबाद, ढकांबे, वरवंडी आदी गावांतील हजारो एकर सुपीक त बागायती शेती बाधित होणार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
मातोरी गावातील संपूर्ण सुपीक व बागायती जमिनीच का अधिग्रहित केल्या जात आहेत? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, नुकतीच मातोरी येथील मातुलेश्वर महादेव मंदिरात मुंगसरे, मातोरी, चांदशी व मखमलाबाद परिसरातील शेतकऱ्यांची बैठक पार पहली, या बैठकीत सुपीक जमिनी अधिग्रहित न करता कोरडवाहू भागातूनच रिंग रोड काढावा, असा ठरात एकमताने मंजूर करण्यात आला.
जिल्हा विकास आराखड्यानुसार (डी.पी.) शहराच्या बाहेरून रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला असला, तरी त्याचा मार्ग दरी-मातोरी-मुंगसरे परिसरातील अत्यंत सुपीक शेतीतून जात असल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. डोंगरमाथ्याच्या पायथ्याजवळून रिंगरोड नेल्यास खर्चही कमी होईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांना अधिकृत नोटीस महत्त्वाचे म्हणजे, अद्याप कोणत्याही मिळालेल्या नाहीत. मात्र, विविध गट नंबरच्या अधिग्रहण कागदपत्रांच्या चर्चा सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रस्तावाला इतर गावांतील शेतकऱ्यांनीही विरोध दर्शवला आहे. विंचूर गवळी येथील शेतकऱ्यांनीही बागायती जमिनी जात असल्याने प्रशासनाने जुन्या रेखांकित मार्गानेच बाह्य रिंग रोड काढावा, अन्यथा भूमिहीन होण्याची वेळ येईल, असा इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV