
मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर मधील उबाठा गटाचे महानगर प्रमुख, माजी नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती राजू उर्फ रेणुकादास वैद्य आणि विधानसभा संघटक अक्षय खेडकर, पिंपरी चिंचवडचे शरद पवार गटाचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, आ. शंकर जगताप, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, शिरीष बोराळकर, पिंपरी चिंचवड चे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार समर्पित आहे. या दोघांच्या कार्याने प्रेरित होत भाजपा वर विश्वास टाकून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विविध पदांवर राहून अनेक वर्षे समाजसेवेचा अनुभव असलेले श्री. वैद्य, अक्षय खेडकर, राहुल कलाटे यांच्या भाजपा प्रवेशामुळे संघटना वाढीच्या कामाला मदत होणार आहे. या सर्वांना बरोबर घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करा, असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले. ज्या विश्वासाने या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्या सर्वांचा विश्वास आम्ही सार्थ ठरवू अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.
यावेळी श्री. सावे म्हणाले की, राजू वैद्य यांनी संभाजीनगरच्या राजकीय क्षेत्रांत अनेक वर्षे काम केले आहे. या पुढील काळात श्री . वैद्य हे निष्ठेने भाजपाच्या विचारधारेचा प्रसार करतील.
श्री. वैद्य म्हणाले की, संभाजीनगर च्या विकासासाठी आणि हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. पक्षाकडून जी जबाबदारी सोपविली जाईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन.
आ. शंकर जगताप म्हणाले की राहुल कलाटे यांच्यासारखा युवा कार्यकर्ता पक्षात आल्याने पिंपरी- चिंचवड मध्ये भाजपा ची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत 100 नव्हे 125 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणू, असा विश्वासही आ. जगताप यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर