
पुणे, 23 डिसेंबर (हिं.स.)।विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या ध्येयासाठी कलेसोबतच तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग करावेत, असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी आज पुण्यात केले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने आणि श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी यांच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कला महोत्सव 2025 चा समारोप आज पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी एनसीईआरटी चे संचालक,दिनेश प्रसाद सकलानी , राज्य शिक्षण सचिव रणजितसिंह देओल , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय कला महोत्सव हे देशातील विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. कला महोत्सव हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रतीक असून कला ही केवळ फावल्या वेळेचा उपक्रम नसून ती शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा अनुभव घेता येतो असेही संजय कुमार म्हणाले.
सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी हा कला उत्सव मोलाची भूमिका पार पाडणार असल्याचे मत एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद संकलानी यांनी व्यक्त केले. यंदाच्या या अकराव्या कला उत्सवासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यातून एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. यावेळी शास्त्रीय गायन, लोकसंगीत, वादन, नृत्य, दृश्यकला आणि द्वि-आयामी कला अशा एकूण १० विविध कला प्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु