रायगड - डॉ. विनायक पाटील यांची महाराष्ट्र बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी निवड
रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग येथील विख्यात, अनुभवी आणि अत्यंत लोकप्रिय बालरोग तज्ञ डॉ. विनायक पाटील यांची महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटना (IAP Maharashtra) यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यभरातील सुमारे ६,५०० हून अधिक बालरोग तज्ञ डॉक्टरां
कोकणातून राज्यस्तरीय नेतृत्व; डॉ. विनायक पाटील अध्यक्षपदी


रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग येथील विख्यात, अनुभवी आणि अत्यंत लोकप्रिय बालरोग तज्ञ डॉ. विनायक पाटील यांची महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटना (IAP Maharashtra) यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यभरातील सुमारे ६,५०० हून अधिक बालरोग तज्ञ डॉक्टरांची ही अग्रगण्य संघटना असून, नुकत्याच पार पडलेल्या विविध पदांच्या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले.

या निवडणुकीत डॉ. विनायक पाटील यांची सन २०२७ साठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, ते २०२७ मध्ये औपचारिकरित्या राज्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागात वैद्यकीय क्षेत्रातून आनंद व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य बालरोग संघटनेच्या माध्यमातून खेडोपाडी, दुर्गम व आदिवासी भागात समाजोपयोगी व जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे. बालआरोग्य, लसीकरण, पोषण, माता-बाल संगोपन यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.” यावेळी त्यांनी रायगड जिल्हा व राज्यातील सर्व बालरोग तज्ञांचे मनःपूर्वक आभार मानले.

डॉ. विनायक पाटील यांची ओळख केवळ कुशल बालरोग तज्ञ म्हणूनच नव्हे, तर माणुसकी जपणारे, प्रेमळ व विश्वासू डॉक्टर म्हणूनही आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांकडून ते कधीही उपचारासाठी तगादा न लावता अनेकदा मोफत उपचार करून मदतीला धावून जातात. रुग्णाचे आरोग्य हेच त्यांचे पहिले प्राधान्य राहिले आहे.

आपल्या व्यस्त वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक उपक्रम, आपत्कालीन मदतकार्य आणि गरजू कुटुंबांसाठी ते सातत्याने पुढाकार घेत असतात. त्यामुळे पालकवर्गासह सहकारी डॉक्टरांमध्येही त्यांच्याविषयी मोठा आदर व विश्वास आहे.

डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटनेच्या कार्याला नवी दिशा व सामाजिक अधिष्ठान मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. त्यांची ही निवड रायगड जिल्ह्यासाठी निश्चितच गौरवास्पद असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande